आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांनी व्यक्त केली खंत
मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवारांसोबत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन्ही गटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं.
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे उदाहरण घ्या. आता नवीन पिढी पुढे येतेय, आता तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही चूक लक्षात आणून द्या, चूक मान्य करत दुरुस्त करुन पुढे जाऊ, असे अजित पवार म्हणाले.
आता तुमचं वय ८२ झाले तुम्ही थांबणार आहे का नाही. तुम्ही शतायुष्य व्हा, असे म्हटले. तसेच माझी काय चूक? मला का नेहमी जनतेसमोर व्हिलन करता असा सवालही अजित पवार यांनी केला.
अजित पवार यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधीत करत आहेत. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे असे ते म्हणाले. माझ्यावर लहानपणापासूनच साहेबांचे संस्कार झाले असल्याचेही अजित पवार म्हणाले. सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले