व्याजाचे पैसे, आर्थिक वाद, बारामतीत भर चौकात काढला काटा, घटनेने उडाली एकच खळबळ….

बारामती : गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहे.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना बारामतीतून उघडकीस आली आहे. आर्थिक वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावच्या हद्दीतील घडली आहे.
रोहित सुरेश गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी, ता. बारामती) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी अमोल वसंत माने व सागर वसंत माने (रा. सोरटेवाडी) या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मयत रोहित याचा भाऊ अविनाश सुरेश गाडेकर यांनी फिर्याद दिली. शनिवारी (ता/ ५) रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादीला रविवारी रात्री (ता.६) १२.४४ वाजता विनायक हरीहर याने फोन करत भाऊ रोहित याच्या तोंडावर, मानेवर, चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे सांगितले. तसेच त्याचा मृतदेह कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रस्त्यावर गोरख खेंग्रे यांच्या पोल्ट्रीफार्मनजीक रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले.
तेथे विनायक हरीहर व इंद्रजित माने हे दोघे थांबले होते. घटनेची माहिती समजताच अविनाश हे हेमंत गाडेकर, याच्यासह कुलकर्णी चारीजवळ गेले. त्यावेळी तेथे रोहित हा गंभीर जखमी अवस्थेत निपचित पडला होता. त्याची हालचाल पूर्ण बंद झाली होती.
त्याच्या चेहऱ्यावर, तोंडावर, मानेवर, हातावर धारदार शस्त्राने वार झालेले होते. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेहापासून काही अंतरावर रोहित याची कार रस्त्याच्या बाजूला उभी केल्याचे दिसून आले आहे.
इंद्रजित माने यांनी या घटनेची खबर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह तपासणीसाठी पाठवला.दरम्यान मृत रोहित याने गावातील अमोल व सागर या दोघांना व्याजाने रक्कम दिली होती. त्याचे १५ लाख रुपये तो मागत होता.
दरम्यान, त्या कारणावरून दोघांनी संगनमत करून त्याला पैसे घेण्यासाठी बोलावून घेत त्याचा खून करत ते पसार झाल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी सांगितले. उपनिरीक्षक राहूल साबळे अधिक तपास करत आहेत.