सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारी यास लोणी काळभोर पोलीसांनी केले १ वर्षाकरीता स्थानबध्द

लोणी काळभोर : पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने राजरोसपणे गुन्हेगारी कृत्य करीत असलेला सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारी यास लोणी काळभोर पोलीसांनी १ वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे.

पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नयेत याकरीता पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, लोखंडी कोयते वापरुन गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, बेकायदेशीर मटका जुगार धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले होते.

त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सद्दाम इरफान अन्सारी (वय २१, रा. इंदिरानगर, कदमवाकस्ती, लोणी काळभोर, ता, हवेली, जि, पुणे) हा पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने घातक धारदार हत्यारांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, बेकायदेशिरपणे घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्याराच्या जोरावर दहशत पसरविणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य राजरोसपणे करीत असल्याने त्यास पुणे शहरातुन हद्दपार करण्यात आले.

परंतु नमुद सराईत आरोपी हा हद्दपारची कारवाई करुन देखील तो गुन्हेगारी कृत्य करुन सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होता. तो प्रतिबंधात्मक कारवाईला जुनामत नसल्याने सामान्य लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन दहशतीची परिस्थितीची निर्माण झालेली होती.
अन्सारी यांचे दहशतीला आळा बसण्याकरीता प्रतिबंधात्मक कारवाई म्हणुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता पोलीस आयुक्त यांनी सराईत गुन्हेगार अन्सारी यास अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रार्देशिक विभाग, पुणे मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परि. ०६, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग, पुणे शहर अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.
