इंडिगोला दणका!विमानसेवेतील भोंगळ कारभाराबद्दल डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस

पुणे : भारतातील एक सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडिगो कंपनीने गेल्या दोन दिवसात तब्बल 1000 पेक्षा जास्त विमानाची उड्डाणे अचानक रद्द केली.यामुळे देशभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झाला असून हजारो प्रवाशांना याचा थेट फटका बसला.आता विमानसेवेतील भोंगळ कारभाराबद्दल डीजीसीएने इंडिगोला थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

इंडिगोच्या विमानसेवेतील या घोळाला इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल इंडिगोने माफी मागितली असून, त्यांच्या एकूण १३८ पैकी १३५ ठिकाणी विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

डीजीसीएने इंडिगोला ७ डिसेंबरपर्यंत प्रवाशांचे तिकीटाचे पैसे परत करण्याचे आणि ४८ तासांच्या आत प्रवाशांचे सामान परत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.इंडिगोच्या या विस्कळीत विमानसेवेचा फटका नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या अनेक मंत्री आणि नेत्यांना बसला. विमानाची तिकिटे असतानाही अनेक जणांना रेल्वे किंवा समृद्धी महामार्गाने प्रवास करून नागपूरला यावे लागले.

हिवाळी अधिवेशनासाठी जाणाऱ्या या नेत्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव, अनिल परब आणि संजय राठोड यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. इंडिगोच्या या गोंधळामुळे स्पाईस जेटने हिवाळी सुट्ट्यांसाठी अतिरिक्त १०० उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
