भारतातील पहिले AI मंदिर! तिरुपती बालाजीमध्ये येणार नवीन तंत्रज्ञान, जाणून घ्या….

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश येथील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिरात लवकरच मोठा बदल केला जाणार आहे. मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने युक्त असलेले कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले जाणार आहे. आपल्या देशातील हा मंदिरात होणारा पहिलाच प्रयोग असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरातील भाविकांची गर्दी नियंत्रित करणं अधिक सोपे होणार आहे. या मंदिराला ‘भारताचं पहिलं AI टेंपल’ असं म्हटलं जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान आणि AI वापरून मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं आकलन केलं जाईल. यामुळे सगळीकडे नियंत्रण ठेवण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.
यामध्ये एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर मंदिराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लाइव्ह फुटेज पाहता येणार आहे. AI-सज्ज कॅमेऱ्यांमध्ये चेहरा ओळखण्याची क्षमता आहे. हे कॅमेरे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांची संख्या सहजपणे मोजू शकतात आणि दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज देतील. ही AI सिस्टीम जमिनीवरील परिस्थिती दर्शवणारे 3D नकाशे तयार करते.

मंदिर परिसरात कोणत्या भागात जास्त गर्दी आहे हे ओळखून गर्दी कमी करण्याचे उपायही सुचवते. नवीन सिस्टीममुळे मंदिराच्या सुरक्षेतही वाढ होईल. यामुळे चोरी किंवा इतर गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी ही सिस्टीम मदत करेल. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, गर्दीत कोणी हरवले किंवा AI भाविकांच्या चेहऱ्यावरील हावभावांचं विश्लेषण करून त्यांना काही अडचण आहे का, हे समजू शकेल. गरज पडल्यास मंदिर कर्मचाऱ्यांकडून त्वरित मदत मिळू शकेल. यामुळे याचे अनेक फायदे होणार असून याठिकाणी याचा चांगला फायदा समोर आल्यास नंतर इतर मंदिरात देखील याचा वापर होऊ शकतो.