भारतीय रेल्वेचं प्रवाशांना मोठं गिफ्ट! तिकीट बुकिंगचा नवा नियम लागू, दलालांना बसणार चाप…

पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय रेल्वेने कोट्यवधी प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रेन तिकीट काही मिनिटांत फुल होण्याच्या तक्रारी आणि दलालांच्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी IRCTC कडून तिकीट बुकिंगचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
सोमवार, 5 जानेवारी 2026 पासून हा नियम अंमलात आला असून, यामुळे सामान्य प्रवाशांना घरबसल्या आरामात तिकीट बुक करण्याची अधिक संधी मिळणार आहे. आजवर सणासुदीच्या काळात किंवा लग्नसराईच्या हंगामात तिकीट बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत सर्व जागा फुल झाल्याचे दिसत होते.
अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर IRCTC ने तिकीट बुकिंग प्रणालीत बदल करत आधार कार्डशी लिंक असलेल्या युजर्ससाठी खास वेळेची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे दलालांना मिळणारा फायदा कमी होणार असून, सामान्य प्रवाशांना थेट लाभ मिळणार आहे.

IRCTC च्या नव्या नियमांनुसार, 5 जानेवारी 2026 पासून आधार कार्डशी IRCTC आयडी लिंक केलेले प्रवासी सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 8 तास तिकीट बुक करू शकतात. रेल्वेच्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगची विंडो 60 दिवस आधी सुरू होते. त्या पहिल्याच दिवशी या 8 तासांच्या कालावधीत फक्त आधार लिंक युजर्सनाच बुकिंगची संधी दिली जाणार आहे.

हा नियम तीन टप्प्यांत लागू करण्यात आला आहे. पहिला टप्पा 29 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाला होता. दुसरा टप्पा 5 जानेवारी 2026 रोजी लागू झाला असून, तिसरा टप्पा 12 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे.
12 जानेवारीनंतर आधार लिंक युजर्स सकाळी 8 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. या बदलामुळे पहिल्या दिवशी एजंट किंवा दलालांना तिकीट बुक करता येणार नाही, असा स्पष्ट संदेश रेल्वेने दिला आहे.
IRCTC च्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश ऑनलाइन तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहार थांबवणे हा आहे. अनेकदा एजंट आणि दलाल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून झपाट्याने तिकीट बुक करून घेतात. परिणामी, सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नाही. होळी, दिवाळी किंवा अन्य मोठ्या सणांच्या काळात ही समस्या अधिक तीव्र होते. रेल्वेकडे याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, हा नियम फक्त जनरल कोट्यातील आरक्षित तिकीट बुकिंगसाठी लागू करण्यात आला आहे. तिकीट बुक करताना प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येणार असून, तो ओटीपी सबमिट केल्यानंतरच बुकिंग पूर्ण होणार आहे. जर एखाद्या प्रवाशाचा IRCTC आयडी आधार कार्डशी लिंक नसेल, तर 60 दिवस आधी बुकिंग सुरू होणाऱ्या पहिल्या आठ तासांत त्याला तिकीट बुक करता येणार नाही
