Indapur News : नीरा भीमा नदीजोड बोगद्यात पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, इंदापूरमधील घटना, कुटूंबाचा एकच आक्रोश..
Indapur News इंदापूर : अकोले (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत काझड व अकोले गावाच्या सीमेवरील नीरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक चारमध्ये विद्युत पंपाची पाहणी करताना २७४ फूट खोल बोगद्यात पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
रतिलाल बलभीम नरुटे (वय ५०) व अनिल बापूराव नरुटे (वय. ३५) अशी त्यांची नावे आहेत. ते काझडचे (ता. इंदापूर) रहिवासी आहेत. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. Indapur News
मिळालेल्या माहिती नुसार, मराठवाड्याला सात टीएमसी पाणी देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठच्या तावशी येथून उजनी म्हणजे भीमा नदीकाठच्या भादलवाडी पर्यंत एक बोगदा तयार करण्यात आला आहे.
या बोगद्याचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले असून, काझड मधील या बोगद्याच्या ठिकाणी काल संध्याकाळी हे दोन शेतकरी आत पडले. जवळपास ३०० फूट खोल बोगद्यात ते पडल्याने परिसरात शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
रात्री उशिरा या बोगद्याचे काम करणाऱ्या कंपनीची क्रेन मागविण्यात आली आणि साडेदहा ते अकराच्या सुमारास कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांनी उतरून दोघांचे मृतदेह शोधले आणि ते मृतदेह वरती आणण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे व उपनिरीक्षक अतुल खंदारे घटनास्थळी दाखल झाले.