Indapur Firing : इंदापूर गोळीबार प्रकरण! पोलीस तपासात समोर आली खळबळजनक माहिती…
Indapur Firing : हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अविनाश बाळू धनवे असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास इंदापूर येथील जगदंबा रेस्टॉरंटमध्ये अविनाश धनवे यांच्यासोबत जेवण घेण्यासाठी तिघेजण थांबले. यावेळी रेस्टॉरंटमध्ये दोन जण आले आणि त्यांनी अविनाशच्या डोक्यात थेट गोळी झाडली.
गोळीबारानंतर अनेक लोक रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी मृतावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेमुळे इंदापूर चांगलेच हादरून गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. Indapur Firing
या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्याचा खून झाला तो देखील आरोपी असून हल्ला करणारे देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले आहेत.
दरम्यान, अविनाश पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही देखील सगळीकडे व्हायरल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.