Indapur : इंदापूरच्या पोलीस निरीक्षकाचा कारनामा उघड, पोलीस निरीक्षकाची एका वर्षात २ कोटींची बेकायदा संपत्ती…
Indapur : इंदापूर येथे राहणार्या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमाविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. त्याच्यावर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हरिभाऊ नारायण खाडे (तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड, रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तसेच पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध १६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४) या दरम्यान हरिभाऊ खाडे याने त्याचे सेवा कालावधीतील परिक्षण काळात सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणार्या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७ लाख ३१ हजार ३५८ रुपये (११६.२८ टक्के) रक्कमेची अपसंपदा संपादित केली आहे.
त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर धारण करुन हरिभाऊ खाडे याला अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे़ पोलीस निरीक्षक किरण बगाटे अधिक तपास करीत आहेत.