Indapur Crime : टोळी अंतर्गत मोठी कारवाई! इंदापूर येथील निलेश बनसुडे टोळीवर लोणी काळभोर पोलिसांचा हिसका, थेट मोक्काअंतर्गत कारवाई, कारवाईत इंदापूरमधील तिघांचा समावेश..

Indapur Crime लोणी काळभोर : इंदापूर च्या निलेश बनसुडे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत नुकतीच लोणी काळभोर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत इंदापूर च्या तिघांचा देखील समावेश आहे. Indapur Crime
टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे (वय २६ वर्ष, रा. राजवेलीनगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर) याच्यासह ओम सोमदत्त तारगावकर (वय २१, रा. महतीनगर, इंदापूर) आणि रोहित मच्छिंद्र जामदार (वय २३, रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर) या टोळी सदस्य असलेल्या दोघा युवकांचा समावेश आहे.
या तिघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, पैकी टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अडवणूक करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दिवेघाटात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला बंदूक सदृश वस्तूचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी या तिघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १० जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर ११ जुलै रोजी या तिघांनाही अटक झाली होती. तिघांची गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१,३,४) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
काळेवाडी (ता. पुरंदर) येथून होंडा अमेझ या चारचाकीतून सासवडमार्गे इंदापूरकडे परतत असताना पार्टी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
टोळी सदस्य असलेल्या ओम सोमदत्त तारगावकर याच्यावर ४ जानेवारी २०२२ रोजी भा.द.वि. कलम ३०७ अंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ जानेवारीच्या रात्री इंदापूर शहरातील एका वकिलाच्या मुलावर कोयत्याने वार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर रोहित जामदार याच्यावर जबरी चोरी, दमदाटी, मारहाण केल्याच्या आरोपाखाली २ मार्च २०२३ रोजी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निलेश बनसुडे याच्यावर जुलै २०१८ मध्ये इंदापूर शहरातील प्रवीण दत्तात्रय शेलार या युवकाला किरकोळ वादातून पोरापोरांची चावडी या ठिकाणी चाकूने भोकसल्याचा आरोप आहे. याच तात्कालिक कारणास्तव १० डिसेंबर २०१८ रोजी निलेश बनसुडे आणि त्याच्या साथीदारांनी प्रवीण शेलार याचाच सख्खा भाऊ बाळासाहेब दत्तात्रय शेलार याचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
या प्रकरणानंतर शहरात दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. मुख्य आरोपी असलेल्या निलेश बनसुडे याला २४ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जवळपास ४ वर्षानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
दरम्यान, संबंधित गुन्ह्यांप्रकरणी हे सर्व आरोपी जामिनावर बाहेर होते. आर्थिक फायद्यासाठी, दहशत कायम ठेवण्यासाठी, तसेच नागरिकांच्या मनात भीती कायम ठेवण्यासाठी टोळी प्रमुख बनसुडे याने गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केल्याचे, तथा त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे लोणी काळभोर पोलिसांनी म्हटले आहे.