दौंडकर स्मारक समिती संकुलाचे उद्या उद्धाटन, अनेक मान्यवर लावणार हजेरी..
रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती येथील माजी आमदार बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या संकुलाचे उद्घाटन व वेबसाइटचे लोकार्पण गुरुवारी (ता. २१) दुपारी ४ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्ही. भागय्याजी यांचा हस्ते होणार आहे.
यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघसंचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहणार असल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष धनंजय गायकवाड, कोषाध्यक्ष सागर फराटे, विठ्ठल वाघ, नानासाहेब लांडे उपस्थित होते. खांडरे म्हणाले, शिरूर तालुक्यास सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न स्व. माजी आमदार बाबूराव दौंडकर यांनी केला. ७२च्या दुष्काळी तालुक्याची दुष्काळ परिषद आयोजन करण्यात त्यांच्या पुढाकार होता. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक रांजणगाव येथे उभारले गेले.
स्मारक समिती मागील २५ वर्षांपासून ग्राम व कृषि विकासाचे कार्य करीत आहे. या स्मारक समितीची एक एकराची जमीन रांजणगाव येथे असून स्थानिक शेतकर्यांसाठी हक्कांचे सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र याठिकाणी व्हावे या दृष्टीने स्मारक समिती काम करते.
शेतकऱ्यांसाठी पाणी माती परीक्षण केंद्र, शेतीविषयक मार्गदर्शक कार्यक्रम, मेळावे, मार्गदर्शन, परिसंवाद, प्रयोग प्रात्यक्षिके, कृषी ग्रंथालय, प्रशिक्षण हॉल, गोवंश संवर्धन, आरोग्य विषयक मार्गदर्शन, कुटुंब सल्ला मार्गदर्शन केंद्र, स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण, सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र, आजारी जनावरांच्या उपचारासाठी फिरते वाहन, आदी उपक्रम स्मारक समितीमार्फत केले जातात.