यवतमध्ये रिक्षाचालकाने प्रवाशाला लूटले! मुंबई हायवेला सोडतो म्हणत ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास….!
यवत : एका रिक्षाचालकाने प्रवाशाला मुंबई हायवेला सोडतो असे सांगून यवतला सोडून त्याच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
संभाजी काशिनाथ पिंगळे ( वय ४५ रा. साई, पो. टाकवी-बुद्रुक, ता. मावळ जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी पिंगळे हे स्वारगेट येथून प्रवास करत असताना अनोळखी रिक्षाचालकाने मुंबई हायवे ला सोडतो असे सांगितले. यावेळी रिक्षाचालकाने पिंगळे यांना पुणे सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्री हॉटेल जवळ सोडले.
दरम्यान, पिंगळे यांच्याजवळ असलेले रोख रक्कम ४० हजार रुपये व एक ५ हजारांचा मोबाईल फोन असा ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन रिक्षातून खाली ढकलून फरार झाला.
या घटना आधारे अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत.