उरुळी कांचनमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी खाजगी फायद्यासाठी! रस्ता मंजूर दुसरा, केला तिसराच…!!

उरुळी कांचन : पुणे जिल्हा नियोजन समितीचा सार्वजनिक सुधार योजनेसाठी १० लाख रुपये मंजूर झालेला रस्ता उरुळी कांचन ग्रामपंचायत व ठेकेदाराच्या संगनमताने मंजूर झालेल्या ठिकाणी न होता ,तो रस्ता ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसतानाही खाजगी घरमालकाच्या मालमत्तेतून करण्याचा पराक्रम जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, ग्रामविकास अधिकारी यांच्या आर्शिवादाने झाला आहे.
संबंधित रस्ता परस्पर वळवून शासनाच्या सार्वजनिक निधीचा खाजगी गैरवापर करुनही संबंधित शासकीय यंत्रणा या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने या गैरप्रकाराबाबात कारवाई करण्याची मागणी खुद्द ग्रामपंचायत सदस्यानेच केली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाटील पार्क ते पाऊशशेरा घर या दरम्यानचा रस्ता करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच नावे हे काम ग्रामपंचायतीने ठेकेदाराने मार्फत केले आहे. मात्र हे काम मंजूर एक ठिकाणी व प्रत्यक्षात झाले दुसऱ्या ठिकाणीअशी अजब किमया ग्रामपंचायतीने गाठली आहे.
ग्रामपंचायतीने हे काम सार्वजनिक लोकोउपयोगात आणणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्ष हे काम खाजगी मालमत्तेत विशिष्ट लोकांचा हेतूसाध्य करण्यासाठी परस्पर बेकायदा केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य मयूर कांचन यांनी केला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या फंडासाठी सदर रस्ता उरुळी कांचन ग्रामपंचायतीने पाटील पार्क ते पाऊशैरा घर करून असा प्रस्ताव दिला असताना ग्रामपंचायतीने मात्र ग्रामपंचायतीकडे गाव नमुना क्र.२३ मध्ये नोंद नसतानाही हा रस्ता परस्पर एका खाजगी घरा साठी तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता खाजगी मालमत्तेत तयार करुन शासन निधीचा गैरवापर केला आहे.
हा संपूर्ण प्रकार होत असताना या निधी वापराचे संपूर्ण दायित्व जिल्हा परिषद शाखा अभियंता तसेच ग्रामविकास अधिकारी उरुळी कांचन यांच्याकडे असताना जाणीवपूर्वक या शासकीय यंत्रणांनी निधीचा गैरवापर होऊनही झोपेंचे सोंग घेतल्याने शासकीय निधीचा अपव्यय झाला आहे.
दरम्यान या संबंध प्रकाराने जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा अपव्यय झाल्याचे समोर आल्याने पालकमंत्री अथवा पुणे जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या प्रकारासंदर्भात जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग डी.के. पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सदर रस्ता हा ग्रामपंचायतीने प्रस्ताव देताना, सार्वजनिक वापरासाठी नियोजित परिसरासाठी मंजूर केला होता.परंतु रस्ता झालेले ठिकाण हे ग्रामपंचायत नमुन्यात नोंद नसल्याची बाब खरी आहे, या संबंधात अर्ज दाखल झाला आहे.
– यशवंत डोळस, ग्रामविकास अधिकारी, उरुळी कांचन.
“जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचा वापराची आपल्यालाही कसलीच कल्पना नसून मंजूर ठिकाणी रस्ता करणे क्रमप्राप्त आहे. सदर कामाची माहिती घेण्यात येईल”
– थडकर शाखा अभियंता ,जिल्हा परिषद बांधकाम विभाग.