‘या’ योजनेत १ लाखांचे होतात २ लाख रुपये, जाणून घ्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या लघु बचत योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत जे कोणताही धोका न घेता पैसे गुंतवतात. त्या चांगला रिटर्न देतात आणि पैसे सुरक्षित देखील असतात. म्हणूनच सामान्य माणूस या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करतो. किसान विकास पत्र ही देखील या योजनांपैकी एक आहे.
ही योजना ३७ वर्षांपासून लोकप्रिय आहे आणि सध्या ७.५% चक्रवाढ व्याज दर देत आहे. पण जर एखाद्याने १ लाख रुपये गुंतवले, तर हे पैसे दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतो? चला जाणून घेऊया..
किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेली रक्कम चक्रवाढ व्याजाने वाढते. म्हणजेच, पहिल्या वर्षी मिळणारे व्याज पुढील वर्षाच्या मुद्दलामध्ये जोडले जाते आणि त्यावर पुन्हा व्याज मिळते. सध्याच्या 7.5% वार्षिक व्याज दरानुसार, १ लाख रुपये दुप्पट होण्यासाठी ९ वर्षे आणि ५ महिने लागतात.
म्हणजे २०२५ मध्ये गुंतवलेली रक्कम २०३४ मध्ये २ लाख रुपयांपर्यंत पोहोचते.योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. किमान ₹1,000 पासून सुरुवात करता येते. कोणताही भारतीय नागरिक ही गुंतवणूक करू शकतो, मग तो शेतकरी असो वा सामान्य कर्मचारी.
ही योजना केवळ प्रौढांसाठी मर्यादित नाही. किमान वय १८ वर्ष असलेली व्यक्ती एकल खाते उघडू शकते, तसेच संयुक्त खाते आणि अल्पवयीन मुलांच्या नावाने पालकही गुंतवणूक करू शकतात. परिपक्वता कालावधी १० वर्षांचा असून, लॉक-इन कालावधी 2 वर्षे 6 महिने आहे. म्हणजे तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर किमान अडीच वर्षे पैसे काढता येत नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे, या योजनेवर तुम्हाला कोणतीही आयकर सवलत मिळत नाही. त्यामुळे करबचतीसाठी गुंतवणूक शोधत असाल, तर ही योजना तितकीशी उपयुक्त ठरणार नाही. मात्र दीर्घकालीन, सुरक्षित परताव्यासाठी ही योजना योग्य पर्याय आहे.