शिरूरमध्ये नवरीने लग्नानंतर महागड्या साड्या आणि सोने ऐवजसह ठोकली धूम…!
शिरूरः शिरूर तालुक्यातील एका गावामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. विवाहासाठी मुली मिळत नसल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सर्वत्र सर्सास घडत आहेत. विवाह जमवून देणाऱ्या टोळ्याही अनेक ठिकठिकाणी आहेत.असाच काहीसा प्रकार हा शिरूर तालुक्यातील एका गावातुन समोर आला आहे.
एका युवकाचे अनेक दिवसांपासून लग्न ठरत नव्हते. विवाह जमविणाऱ्या एकाने दुसऱ्या जिल्ह्यातील एक मुलगी असल्याचे सांगितले व मुलीकडील कुटुंबियांची परिस्थिती गरिब असल्यामुळे त्यांना रक्कम द्यावी लागेल, असेही सांगितले. युवकाला मुलगी मिळत नसल्यामुळे मुलाकडील नातेवाईक पैसे देण्यास तयार झाले होते. दोन लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली. मुलीचा फोटो दाखवल्यानंतर मुलगी युवकाला पसंत पडली होती.
यानंतर , शिरूर तालुक्यातील हे कुटुंबिय दुसऱ्या जिल्ह्यात गेले असता मुलगी आवडल्यामुळे तिला सोने करण्यात आले. महागड्या साड्या घेण्यात आल्या. तिकडेच निवडक नातेवाईकांमध्ये विवाह उरकला. विवाह झाल्यामुळे नवरदेव पण खूष होता. लग्नानंतर वऱ्हाडी नवरीला घेऊन शिरूर तालुक्यात पोहचले. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नानंतर मोठी पुजाही घालण्यात आली. गावातील नागरिकांबरोबरच पै-पाहुणेही पुजेला आले होते. जेवणाच्या पंगती उठल्या होत्या. तो पर्यंत सर्व काही ठीक होते.
याचदरम्यान , लग्नानंतर नवरीला माहेरी पाठवण्याची प्रथा आहे त्यामुळे गावातून भाड्याने गाडी करून नवरीला माहेरी घेऊन निघाले. सासरहून माहेरी जाताना नवरीने सर्व साड्या आणि सोने सोबत घेतले होते. पण, कोणालाही कुचभरही शंका नव्हती. कारण, लग्न झाल्यापासून ते पुजा होईपर्यंत नवरी आनंदात वावरत होती. मोटारीमध्ये नवरी तिच्या बॅगेसोबत बसली. शिवाय, तिला माहेरी सोडण्यासाठी सासरकडील निवडक व्यक्ती सुद्धा होते. मोटार माहेरच्या दिशेने निघाली. पण, नवरीच्या मनात काही वेगळेच होते. गावाजवळ मोटार गेल्यानंतर काही अंतरावर मोटार थांबायला लावली. मैत्रिणीला साड्या दाखवून लगेच येत असल्याचे सांगून बॅग सोबत घेतली. एका घराच्या दिशेने नवरी गेली.
मोटारीमध्ये सासरकडील व्यक्ती वाट पाहात बसले होते. खूप वेळ झाला तरी नवरी न आल्यामुळे मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद लागला. तिच्या नातेवाईकांसोबतही संपर्क होत नव्हता. यामुळे मोटारीमध्ये थांबलेल्या व्यक्तींना काय करावे कळेनासे झाले. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही नवरी न आल्यामुळे त्यांनी परत शिरूर तालुक्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कारण, नवरीने हळूच तेथून धूम ठोकली होती. नवरीने धूम ठोकताना सोने, महागड्या साड्या नेल्यामुळे मुलाकडील कुटुंबियांना मानसिक आणि आर्थिक मोठा फटका बसला आहे. पण, मुलाकडील कुटुंबियांनी बदनामी पोटी तक्रार दाखल केलेली नाही.
दरम्यान, विवाहासाठी मुली मिळत नसल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सर्सास घडत आहेत. विवाह जमवून देणाऱ्या टोळ्या ठिकठिकाणी आहेत. यामुळे सर्व काळजी घेऊनच विवाह ठरवावेत. शिवाय, फसवणूक झाल्यास जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.