पुण्यात मध्यरात्रीच पतीने ब्लँकेटने तोंड दाबून बायकोला संपवले, मृतदेहाजवळ बसला अन्…; घटनेने सगळेच हादरले

पुणे : घरगुती वाद, संशय आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्या एका पतीने आपल्या ५३ वर्षीय पत्नीची झोपेतच हत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील खडकी परिसरातील चिखलवाडीत असलेल्या ओरियन कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी पहाटे घडली आहे.

धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर पतीने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून खुनाची कबुली दिली. दिलीप नंबुरी कंडाथील (५६) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दिलीप नंबुरी कंडाथील हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास त्याची पत्नी बिंदू झोपेत असताना, दिलीप याने त्यांच्या चेहऱ्यावर ब्लँकेट टाकून नाक आणि तोंड दाबलं.

श्वास गुदमरल्याने बिंदू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिल्यानंतर, मंगळवारी सकाळी ८ वाजता त्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
हत्येमागे अनेक कारणे…
बिंदू या नैराश्यावर उपचार घेत होत्या. पती त्याच्या पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा त्यांना संशय होता, त्यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत असत. यासोबतच रिअल इस्टेट व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे दिलीप कर्जबाजारी झाला होता आणि मानसिक तणावाखाली होता. रोजच्या कटकटीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दिलीप याने शांतपणे पोलिसांना घरात नेले आणि बेडरूममधील मृतदेह दाखवला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.