पुण्यात भोंदू बाबाचा महिलेला गुप्तधनाच्या बहाण्याने तब्बल अडीच लाखाचा गंडा ; आरोपीस अटक

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात खून,हाणामारी,अत्याचार आणि फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.अशातच आता पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये गुप्तधन शोधून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तब्बल अडीच लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय फिर्यादी या पुण्यातील कोथरूडच्या रहिवाशी आहेत. फिर्यादी आणि भोंदू बाबा म्हणजेच खान बाबा यांची एका व्यक्तीमुळे ओळख झाली होती. या भोंदू बाबा ने फिर्यादी यांना तुमच्या घरात गुप्तधन आणि सोन्याचा खजिना आहे आणि ते मी काढून देतो असं अमिष दाखवलं. या अमिषाला बळी पडून फिर्यादी तयार झाल्या. हा सगळा प्रकार 12 जून ते 15 जुलै दरम्यान घडला. गुप्तधनाच्या बहाण्याने या महिलेला खान बाबा उर्फ मदारी मोहम्मद खान या व्यक्तीने तब्बल अडीच लाखाला उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान या प्रकरणी भोंदू बाबावर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), महाराष्ट्र नरबळी व इ अमानुष अनिष्ट अघोरी प्रता व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत असलेल्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.