नागपूरमध्ये बोगस शिक्षकांनी सरकारला लावला कोट्यवधी रुपयांना चुना, तब्बल ५८० शिक्षक बोगस….

नागपूर : नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ५८० शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करून त्यांच्या वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी तीन जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात बोगस मुख्यध्यापकाच्या भरतीवरून दोघांना अटक झाली होती. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी शाळांमध्ये तब्बल ५८० शिक्षकांची भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या बोगस शिक्षकांच्या वेतनापोटी सरकारच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.
शिक्षण विभागाच्या एका आदेशात हा प्रकार मान्य करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांमध्ये बोगस शिक्षकांची भरती केल्याच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेचे वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांना शिक्षण विभागाकडून विशेष आदेश काढत निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, त्यांच्या निलंबनासंदर्भात जे आदेश काढले गेले, त्यात “नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ पासून ५८० प्राथमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आले. तसेच त्यांच्या नियुक्तीला नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी सुद्धा नियमबाह्य पद्धतीने प्रदान करण्यात आले.
त्यामुळे बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष नियमबाह्य पद्धतीने वेतन देऊन शासकीय तिजोरीला मोठं नुकसान पोहोचवल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.