सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्वाची अपडेट! तब्बल 5 महिन्यानंतर गोपाल बदने येणार तुरुंगाबाहेर, कोर्टाचा मोठा निर्णय

पुणे : फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे 23ऑक्टोबर 2025 रोजी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्या पूर्वी डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांने चार वेळा अत्याचार केल्याच लिहीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील करण्यात आले होते.

गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे,असा गंभीर आरोप त्या डॉक्टरने केला होता. या पुराव्याच्या आधारे फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल करत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक केली होती. गेल्या पाच महिन्यापासून अटकेत असलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गोपाळ बदने याला जामीन मिळाल्यामुळे आता खटल्याच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रकरणात प्रशांत बनकर याच्यासह इतर बाबींचा तपासही पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.