चंद्रयान- 3 मध्ये ट्रक चालकाची महत्वाची भूमिका! चंद्रयान आकाशात झेपावले आणि आईच्या डोळ्यात आले पाणी….
नवी दिल्ली : चांद्रयान-३ ने काल दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं आहे. या ऐतिहासिक प्रवासात अनेक शास्त्रज्ञ आणि कर्मचारी कित्येक महिन्यांपासून रात्रंदिवस मेहनत घेत होते. शास्त्रज्ञ सोहन यादव हे त्यापैकीच एक.
अंतराळ मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीम रांचीच्या खुंटी जिल्ह्यातील तपकरा या गावातील शास्त्रज्ञ सोहन यादव हे याच टीमचा एक भाग आहेत.
सोहनचे वडील घुरा यादव ट्रकचालक आहेत. तपकरासारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन सोहन शास्त्रज्ञ झाला. गेल्या सात वर्षांपासून सोहन इस्रोशी संलग्न आहे. सोहन यांची आई देवकी देवी म्हणाल्या की, सोहन लहानपणापासूनच खूप हुशार होता.
…अन् आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले
आसामच्या उत्तरेकडील भागातील लखीमपूर गावातील लोकांनी ‘चंद्रयान-३’ चे प्रक्षेपण अभिमानाने पाहिले; कारण देशाच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेत त्यांच्या गावच्या मुलाचीही महत्त्वाची भूमिका होती. चयन दत्ता यांच्या पालकांनी काही मित्र आणि ग्राहकांसह उत्तर लखीमपूर येथील त्यांच्या छोट्या दुकानात मोबाइलवर प्रक्षेपण पाहिले.
मुलाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि तिने फक्त हसतच प्रतिसाद दिला. चयन दत्ता हे तेजपूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. ते सध्या अंतराळ विभागाच्या यूआर राव उपग्रह केंद्रात वैज्ञानिक/अभियंता-जी आणि चंद्रयान ३ चे उपप्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -३ चं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताच्या या मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेलं नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठीही मदत होईल. चांद्रयान -३ मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल.