तुळजाभवानी भक्तांसाठी महत्वाची बातमी! आजपासून देवीचं दर्शन बंद, नेमकं कारण काय?

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत आहे. मात्र या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मंदिरात आजपासून तुळजाभवानी देवीचं दर्शन घेता येणार नाही.
तसेच धाराशिव जिल्ह्यातील या प्रसिद्ध मंदिरातील गाभाऱ्याला तडे गेल्यामुळे दुरुस्तीसाठी मंदिर प्रशासन आणि पुरातत्व विभागाने मिळून मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून पुढील दहा दिवस देवीचं दर्शन घेता येणार नाही.
दरम्यान, लाखो भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये गर्दी करतात. मात्र, गुरुवारपासून दुपारी १२ वाजेपासून गाभाऱ्याच्या कामासाठी मंदिर बंद करण्यात आलं आहे. या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात येणार असून केवळ मुखदर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, गाभाऱ्याला तडे गेल्याची तक्रार अनेक दिवसांपासून समोर येत होती. याबाबत राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्यात मतभेद होते. मात्र, अखेर तोडगा काढत दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे.
नवरात्र महोत्सव अगदी जवळ आल्याने मंदिर दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. यामध्ये गाभाऱ्याला प्लास्टरिंग करून त्याची मजबुती करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे पुढील १० दिवस दर्शन बंद राहील.
दर्शन बंद राहिल्यामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या भाविकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांना गर्दी टाळण्याचं आणि मंदिर परिसरात न येण्याचं आवाहन केलं आहे.