तरुणांसाठी महत्वाची बातमी! सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : नवीन वर्षात शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रशासकीय विभागांनी २०२६ सालासाठी विविध पदांच्या भरतीची तयारी सुरू केली असून, उमेदवारांनी आतापासूनच आपल्या अर्जांची आणि तयारीची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, विविध क्षेत्रांत रोजगाराचे मोठे मार्ग मोकळे होणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पदभरती राबवणार आहे.
यामध्ये पदवीधरांसाठी सीजीएल, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सीएचएसएल , तसेच एमटीएस आणि जीडी कॉन्स्टेबल अशा लोकप्रिय परीक्षांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, तांत्रिक क्षेत्रातील ज्युनियर इंजिनिअर आणि सीपीओ सारख्या पदांसाठीही आयोग नियमितपणे जाहिराती प्रसिद्ध करून परीक्षांचे आयोजन करणार आहे.

दुसरीकडे, भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी तरुण वर्ग मोठ्या आशेने वाट पाहत आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नसल्याने दहावीच्या गुणांवर आधारित निवड केली जाते. २०२५ मध्ये या प्रक्रियेसाठी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते, त्याच धर्तीवर २०२६ मध्येही लवकरच रिक्त पदांची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने २०२६ चे वार्षिक वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. या कॅलेंडरनुसार, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी ते मार्चमध्ये असिस्टंट लोको पायलट पदांची भरती होईल.
त्यानंतर एप्रिल ते जून दरम्यान तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. वर्षाच्या उत्तरार्धात पॅरामेडिकल, एनटीपीसी , मंत्रालयिक प्रवर्ग आणि ग्रुप डी (Level 1) सारख्या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आयबीपीएस आणि एसबीआय मार्फत लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असतील. संरक्षण दलात जाण्यासाठी यूपीएससी मार्फत एनडीए आणि सीडीएस परीक्षांचे आयोजन वर्षातून दोनदा केले जाईल. तसेच अग्निवीर, नौदल आणि हवाई दलात विविध पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
