शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! रायगडवरील ‘ही’ मोठी सोय ६ दिवस राहणार बंद…

पुणे : शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गडावर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोपवे सेवेबाबत प्रशासनाने तात्पुरता निर्णय घेतला असून काही दिवस ही सुविधा उपलब्ध राहणार नाही.

त्यामुळे गडदर्शनाचे नियोजन करणाऱ्यांनी तारखा लक्षात घेणे आवश्यक आहे. येत्या २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रोप-वेची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. रोप-वेच्या वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे, पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्याप्रमाणे करावे, असे आवाहन रोप-वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरवर्षी सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवली जाते. यावेळीही सहा दिवसांत यंत्रणेची सविस्तर पाहणी केली जाणार आहे.

मुख्य स्टील केबल्सची तपासणी, ट्रॉलींची स्थिती, ब्रेक यंत्रणेची कार्यक्षमता आणि विविध सुरक्षा उपकरणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर विद्युत प्रणाली, नियंत्रण यंत्रणा आणि तांत्रिक सुटे भाग यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. गडावर दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत राहावा, याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत सर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर १ मार्च २०२६ पासून रोपवे सेवा पूर्ववत सुरू केली जाईल. नियमित वेळापत्रकानुसार पर्यटकांना पुन्हा गडावर जाण्यासाठी ही सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
ज्यांना पायी चढाई करणे शक्य नाही किंवा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि इतर पर्यटक रोपवेवर अवलंबून असतात, त्यांनी या तारखा लक्षात घेऊनच गडभेटीचे नियोजन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.