पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गुरूवारी या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार, जाणून घ्या..


पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गुरूवारी शहरातील काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच मंगळवारी आणि बुधवारी योग्य प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पाण्याची व्यवस्थापन नीट करण्याची गरज आहे. पाणीपुरवठा पुनर्संचयन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे ही बंदी करण्यात येत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याशी संबंधित मोठ्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत अनेक भागांतील पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

       

विशेषतः शुक्रवारी सकाळीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना वेळेआधी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

पालिकेच्या माहितीनुसार नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, बडगाव जलशुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, एमएनडीटी HLR, SNDटी MLR टाकी परिसर, चतु:शृंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, खडकवासला जॅकवेल वारजे फेज 1 आणि 2, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र आणि नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागांमधील रहिवाशांना पाण्याचा पुरवठा गुरुवारी मिळणार नाही.

खडकवासला धरणापासून पर्वती जलकेंद्रापर्यंत 3000 मिलीमीटर व्यासाची रॉ वॉटर पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. आता या पाइपलाइनशी जोडलेल्या दोन 1400 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईन्सवर दुरुस्ती आणि फ्लो मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

याचसोबत 1400 मिलीमीटरच्या लाईनवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बसविणे आवश्यक असल्याने गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. या मोठ्या दुरुस्तीमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र ही कामे भविष्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद आणि शुक्रवारी कमी दाबाचा पुरवठा होणार असल्याने नागरिकांनी आगाऊ नियोजन करण्याची गरज आहे. विशेषतः कुटुंबातील वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाठी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा ठेवणे महत्त्वाचे आहे. वारंवार पाण्याचा अपव्यय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!