पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरात ७ नवीन पोलीस स्टेशन्स, तर ३ नवे झोन मंजूर…

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरांमध्ये झपाट्याने होणारे नागरिकरण आणि वाढत्या गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने रविवारी मोठा निर्णय घेतला आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पुणे शहरात पाच तर पिंपरी चिंचवडमध्ये दोन अशा एकूण सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच तीन नवीन प्रशासकीय झोनही स्थापन करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांना अधिक जलद पोलीस सेवा मिळणार असून, गुन्ह्यांवर वेळीच नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या आणि लोकसंख्येचा भार वाढलेल्या भागांमध्ये पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नऱ्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, मांजरी आणि लोहेगाव येथे पाच नवीन पोलीस स्टेशन्स स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सायबर पोलीस ठाण्यासह पुणे शहरातील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या आता 45 झाली आहे.

नऱ्हे पोलीस ठाणे सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून, लक्ष्मीनगर येरवडा पोलीस ठाण्यातून, मांजरी हडपसर पोलीस ठाण्यातून, लोहेगाव विमानतळ पोलीस ठाण्यातून, तर येवलेवाडी कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांमधून विभाजित करण्यात येणार आहे. यामुळे पोलीस ठाण्यांचा ताण कमी होऊन तक्रारींची जलद दखल घेतली जाणार आहे.
पुणे शहरासाठी झोन सहा आणि झोन सात असे दोन नवीन प्रशासकीय झोन तयार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन झोनसाठी दोन अतिरिक्त पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच नव्या पोलीस ठाण्यांसाठी सुमारे ८५० नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
झोन सहामध्ये हडपसर, काळेपडळ, मुंढवा, फुरसुंगी, मांजरी आणि लोणीकाळभोरचा समावेश असेल, तर झोन सातमध्ये लोणीकंद, वाघोली, लोहेगाव, विमानतळ, खराडी आणि चंदननगर हे भाग येणार आहेत. यामुळे पूर्व आणि दक्षिण पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.
पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड पोलीस दलासाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन नवीन पोलीस स्टेशन्स आणि एक नवीन झोन स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एमआयडीसी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चाकणमध्ये ही नवीन पोलीस ठाणे उभारली जाणार आहेत.
दरम्यान, चाकण दक्षिण हे आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांमधून विभाजित केले जाणार असून, चाकण उत्तर महाळुंगे हे महाळुंगे एमआयडीसी परिसरातून तयार होणार आहे. यासोबतच पिंपरी चिंचवडसाठी तीन नवीन पोलीस उपायुक्त आणि सहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवडमधील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या आता २५ झाली आहे.
