प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या..

पुणे : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातून विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटी बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, संगमनेर, यवतमाळ, अकोला, अमरावती अशा लांबच्या प्रवासासाठी नागरिकांनी आधीच बुकिंग करून ठेवलं आहे.
तसेच, गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने १५ जून २०२५ पर्यंत अधिक एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपताच व नोकरी करणाऱ्या प्रवाशांसाठी सुट्यांची संधी चालून आली आहे.
घरगुती कार्यक्रम, गावी जाणं किंवा पर्यटनासाठी अनेक प्रवासी आता एसटीकडे वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे एसटी विभागाने सर्व मार्गांवर गाड्यांची संख्या वाढवण्याचे नियोजन केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर व रात्री उशिरा गाड्या सोडण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, परीक्षांच्या अंतिम टप्प्यात प्रवेशलेल्या विद्यार्थ्यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रवासाचे नियोजन सुरू केल्याने, त्या कालावधीत गाड्यांची आणखी वाढ होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितले. यासह विवाह समारंभ, धार्मिक यात्रा, तसेच ग्रामीण भागात सुरू होणारे विविध उत्सव लक्षात घेता, ग्रामीण मार्गांवर देखील अधिक गाड्या पुरवण्यात येणार आहेत.
पुणे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी स्पष्ट केलं की, जर प्रवासी अधिक नोंदवले गेले, तर प्रत्येक मार्गावर जादा फेऱ्या लावण्यात येतील. गर्दीच्या वेळी कोणत्याही प्रवाशाला अडचण येऊ देणार नाही. तिनशे ते पाचशे अतिरिक्त बसगाड्या राज्यभरात धावणार असून पुण्यातून निघणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.