लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! अदिती तटकरेंनी ‘या’ महिलांना दिला दिलासा, नेमकं काय म्हणाल्या?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. मात्र या योजनेमुळे सध्या मोठा आर्थिक ताण हा सरकारच्या तिजोरीवर पडताना दिसत आहे.

या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, ज्या महिलांचा पती आणि वडील नाहीत, अशा लाभार्थी महिलांसाठी खास बदल करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी करताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन, तर कधी ओटीपी न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बदल सुरू आहेत. त्यामुळे काही वेळ लागू शकतो, पण कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही.
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्या आयुष्यात ना पती आहेत ना वडील आहेत, अशा महिलांसाठी प्रणालीत विशेष सुधारणा केली जात आहे. सरकारकडून या लाभार्थी महिलांच्या पात्रतेची नोंद व्यवस्थित व्हावी म्हणून अतिरिक्त पडताळणी प्रक्रिया लागू केली जाणार आहे. त्यांनी सांगितले की, ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि कोणालाही या योजनेपासून वगळले जाणार नाही.
त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. विरोधक आपली मते व्यक्त करत असतात. मात्र अजितदादांनी २४ तासांच्या आत स्पष्टीकरण दिलं आहे. राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असं अदिती तटकरे यांनी म्हटलं. तसेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वादही घेतल्याचं सांगितलं.
