MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!उत्तरपत्रिका आणि मूल्यांकनात केले मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर माहिती..


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवरच आता आयोगाकडून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेसाठीच्या उत्तर पत्रिकेत बदल करण्यात आले आहेत. तसेच उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन,अवैध उत्तरपत्रिका संदर्भातील काही बदल करण्यात आले आहे.

एमपीएससीने उत्तरपत्रिकेत मोठा बदल केला असल्याचे जाहीर केले आहे. नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी 1 मार्च 2026 पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी हे नवीन बदल काय आहेत ते जाणून घेऊयात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन नमुना विद्यार्थ्यांच्या लॉगिन खात्यात उपलब्ध करून दिला आहे. यावरूनच विद्यार्थ्यांना पुढीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा सराव करणे सोपे जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेसाठीच्या उत्तरपत्रिकेत हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

नव्या उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची पद्धत, उत्तर लिहिण्याची रचना आणि कोडिंग प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. ओएमआरशी संबंधित त्रुटी टाळण्यासाठी उत्तरपत्रिका अधिक सुस्पष्ट आणि वापरण्यास सोपी केली आहे. उत्तरांची तपासणी अधिक जलद आणि अचूक होण्यासाठी ही रचना उपयुक्त ठरणार, असल्याचे एमपीएससीकडून सांगण्यात आले.

सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार दोन प्रतीमध्येच (कार्बनलेस) असणार आहेत. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये, तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत दोन भागात असणार आहे.

भाग-१ केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग-२ मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी, इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल.

उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या पद्धतीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पाचपैकी एकही पर्याय छायांकित न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर अशा कारणांसाठी प्रत्येक प्रश्नाकरिता २५ टक्के किंवा १/४ गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. नव्या कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली, तरी ती अपूर्णांकातच राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

बैठक क्रमांक 8 अक्षरांक ऐवजी 7 अंकी (न्यूमरिक) असणार आहे. बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरुन संपूर्ण निवडप्रक्रियेकरीता कायम राहील.मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग-१ पासून भाग-२ समवेक्षकाने वेगळा करावयाचा आहे.

प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवताना उत्तरपत्रिकेवरील चार पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवावयाचे असले, तरी उत्तरपत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!