बारामती की इंदापूर? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महत्वाची नावे आली पुढे, कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या….


पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत जिल्हा राजकारणात आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.

तसेच ७३ पैकी तब्बल ५१ जागांवर विजय मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. अध्यक्षपद यंदा ‘खुले’ असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असून अनुभवी आणि नवख्या सदस्यांमध्ये तीव्र राजकीय चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.

विजयी उमेदवारांच्या नावांचे गॅझेट बुधवारी (ता. ११) प्रसिद्ध झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून ग्रामीण भागात संभाव्य नावांबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्या तालुक्यातून सर्वाधिक जागा निवडून येतील, त्या तालुक्यांना संधी दिली जाईल, असे सूचक वक्तव्य केले होते.

त्या निकषांनुसार बारामती, इंदापूर, मावळ आणि राजगड तालुक्यांतील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत पडल्या आहेत. त्यामुळे या तालुक्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तसेच,यापूर्वी अध्यक्षपदाची संधी न मिळालेल्या तालुक्यांना यंदा संधी देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पक्षश्रेष्ठी अनुभवी सदस्यांवर विश्वास दाखवणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार, हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. अनुभवी सदस्यांचा विचार झाल्यास दौंडचे वीरधवल जगदाळे, मुळशीचे शांताराम इंगवले आणि आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

तसेच बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांनाही संधी मिळू शकते. तसेच शिरूरच्या माजी सभापती सुजाता पवार आणि भोरचे विक्रम खुटवड यांची नावेही चर्चेत आहेत.

दुसरीकडे, नव्याने निवडून आलेल्या तरुण सदस्यांमध्ये अंकिता पाटील, प्राजक्ता दुर्गाडे, तुषार थोरात, यशराज जगदाळे, सुनीता बुट्टे पाटील यांच्यासह करण खलाटे यांची नावे पुढे येत आहेत. पूर्वीही प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांना संधी देण्याची उदाहरणे असल्याने यंदा अध्यक्षपद किंवा किमान एखाद्या महत्त्वाच्या समितीच्या सभापतिपदावर नव्या चेहऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अध्यक्षपदाची निवड करताना तालुकानिहाय प्रतिनिधित्व, सामाजिक समतोल,अनुभव, पक्षनिष्ठा आणि आगामी राजकीय समीकरणे या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असल्याने नेतृत्व सक्षम आणि सर्वसमावेशक असावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच,राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अध्यक्षपदासाठीची अंतर्गत स्पर्धा चुरशीची ठरणार असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.लवकरच होणारी अधिकृत घोषणा या राजकीय चर्चांना पूर्णविराम देईल.

बारामतीसाठी अध्यक्षपद महत्त्वाचे…

अजितदादांच्या जाण्यानंतर आता अजित दादांची पुढची पिढी म्हणजेच पार्थ पवार आणि जय पवार हे राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पूर्णतः सक्रिय दिसत आहेत विशेषतः आई बरोबर सातत्याने ते राज्याच्या व केंद्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी देखील दिसत आहेत खरे तर ग्रामीण भागातली राजकारण हे गाव पातळीशी निगडित असते अशावेळी गाव गाड्याचे विकासाचे राजकारण करायचे असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महत्त्वाची असते.

जय पवार आणि पार्थ पवार यांना अजितदादाप्रमाणेच गाव गाड्यातून सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठी बारामती तालुक्यातील अध्यक्ष असणे या दोघांसाठी महत्त्वाचे असणार आहे. पहिल्या सव्वा वर्षात बारामतीतून गावगाडा हाकला तर त्यांना राजकारणाची बेरीज वजाबाकी अधिक जवळून पाहता येईल, त्या अनुषंगाने बारामतीला अध्यक्ष पद मिळावे अशीच साऱ्यांची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!