पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे IMD कडून हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार..

पुणे : राज्यात मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय. काल (ता.८ ) मुंबई,नवी मुंबईसह पुणे मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लागली .

आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात १३ ऑगस्टपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मात्र, आज रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी, हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ कायम राहील.
त्यानंतर दोन दिवसांनी मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार तासांत छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे.
आज (९ ऑगस्ट) नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तर ११ ऑगस्ट रोजी लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत आणि १२ ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात ८ आणि ९ ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी, तर १० ते १२ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.