मी आता जातो, पण…,पुण्यात बहिणीला व्हिडिओ कॉल करत भावाने मृत्यूला कवटाळले, नेमकं काय घडलं?

पुणे : पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलींकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं सदर व्यक्तीने म्हटलं आहे.

महत्त्वाचे म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई, असे म्हणत जीवन संपवलं. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितीन साळवे (वय अंदाजे ४६ ते ४९, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन साळवे हे मुंबई येथील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते फक्त शनिवार आणि रविवारी पुण्यात राहत असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
नितीन साळवे यांच्या आत्महत्येबाबत त्यांच्या बहीण पूनम उमेश कांबळे यांनी नितीनच्या पत्नी आणि मुलींवर गंभीर आरोप केले आहेत. पूनम यांनी सांगितले की, “नितीनला त्याची पत्नी आणि दोन मुली सतत त्रास देत होत्या. घरात रोज भांडणं होत असत. नितीनची पत्नी बाहेर अनैतिक संबंध ठेवत होती.
आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच दोन मुलींनीही अपमानास्पद वर्तन केले. त्यामुळेच नितीनने मला शेवटचा व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत मृत नितीन साळवे यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.