पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…, पिपरी-चिंचवड येथे नेमकं काय घडलं?

पुणे : पिपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हुंड्यासाठी तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात असल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच सासू आणि सासऱ्यांनी मारहाण केल्यामुळे तिच्यावर संध्या उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी पतीसह सासरे आणि सासूविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेचा विवाह 24 नोव्हेंबर 2024 रोजी झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या एका महिन्यांतच सासरकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला, असा आरोप तिने केला आहे.
पती राजदीप, सासरे प्रदीप आणि सासू हेमलता यांनी तिला छोट्या-छोट्या गोष्टींवरून शिवीगाळ करणे, जेवण न देणे आणि सतत त्रास देणे सुरू केले. तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी शेअर मार्केटमधील तोट्याचे कारण सांगून पीडितेकडे ५ लाख रुपयांची मागणी केली.

दबावाखाली तिने वडिलांकडून ३ लाख रुपये आणून दिले. मात्र, दिवाळीच्या काळात पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. छळ इतका वाढला की, पीडितेला एक-दोन महिने सासरी येऊ दिले नाही. 21 डिसेंबर 2025 रोजी ती सासरी परतली तेव्हा “पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको” अशी धमकी देऊन तिला घरात प्रवेश नाकारला गेला.

यावेळी सासरा प्रदीप याने बेल्टने तर पती राजदीपने बुक्के आणि लाथांनी बेदम मारहाण केली. सासू हेमलतानेही मारहाणीत सहभाग घेतला, असा गंभीर आरोप आहे. या मारहाणीमुळे पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दापोडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
