मुंबईत धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत…! करुणा मुंडे यांची थेट ऑफर

मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

असे असताना आता धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी बंगल्यासंदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी साडे चार महिन्यांपूर्वी मंत्री पदाचा राजीनाम दिला. पण अद्याप शासकीय निवासस्थान सोडले नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसात बंगला सोडणे अपेक्षित होते. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पद हे छगन भुजबळांना मिळाले आणि सातपुडा बंगल्याचा शासकीय आदेश निघाला. पण बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. बंगला न सोडल्याने धनंजय मुंडे यांना दंड लावण्यात आला आहे. त्याची रक्कम आता 42 लाखांपर्यंत पोहचली आहे.

दरम्यान, यावर करूणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन-चार घरे आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्ये आमचे देखील घर आहे. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईतील बंगला न सोडण्यामागे मुंडेंनी दोन कारणं दिली आहेत. धनंजय मुंडेंचं आजारपण आणि त्यांच्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न. त्यामुळे त्यांनी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते, येणाऱ्या काळात ते बंगला सोडणार का? हे लवकरच समजेल.