‘अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवायचंय’, बीडमधील तरुणाला ‘इतक्या’ लाखांचं आमिष, पाकिस्तानातून आला मेसेज..

बीड : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला सोशल मीडियावर अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची ऑफर देण्यात आली आहे.

या प्रकरणाची तक्रार शिरूर कासार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. संबंधित तरुणाला या कटामध्ये सामील होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
तरुणाच्या सोशल मीडिया खात्यावर आलेल्या या मेसेजमध्ये अयोध्येतील राम मंदिर आरडीएक्सने उडवण्याची योजना असल्याचे नमूद करण्यात आले. संशयित व्यक्तीने आपली ओळख पाकिस्तानी असल्याचे दाखवत कराचीचे लोकेशनही शेअर केले.

याशिवाय, या कामात सहभागी होण्यासाठी आणखी ५० लोकांची गरज असल्याचे आणि सर्वांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येतील, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित तरुणाने त्वरित शिरूर कासार पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
दरम्यान, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून मेसेज कोणाकडून, कुठून आणि कशासाठी पाठवण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे.