“अजित पवारांवर बोलण्याची माझी कुवत नाही” ; महेश लांडगे नरमले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय वाद चांगलाच वाढला होता. प्रचारादरम्यान आमदार लांडगे यांनी अजित पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने वातावरण तापले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार लांडगे यांनी भूमिका बदलल्याचे दिसून आले.

आकुर्डी येथे झालेल्या सभेत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “माझी आणि अजित पवार यांची उंची तुलना करता येणार नाही. ते राज्याचे नेतृत्व करतात. त्यांच्यावर बोलण्याची माझी कुवत नाही.” या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेत नरमाई आल्याचे स्पष्ट झाले.
महापालिकेत 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली, असे सांगत लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचा उल्लेख केला. रेडझोनचा प्रश्न मार्गी लावणे, प्राधिकरणाच्या 98 हजार मालमत्ता फ्री होल्ड करणे, 52 वर्षांनंतर साडेबारा टक्के परतावा देणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आणि न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत मंजूर करणे, ही सर्व कामे भाजप सरकारमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्यावर झालेल्या आरोपांना आपण योग्य प्रकारे उत्तर दिले असल्याचे नमूद करत लांडगे म्हणाले, “महायुतीतील नेत्यांचा आदर फक्त भाजपनेच करायचा का? शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला असताना आम्ही संयम राखला. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनापासून काम केले. भोसरीतून मोठे मताधिक्य दिले. तरीही आमच्याविरोधात खोटे कथानक पसरवले जात आहे.”
दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेच्या माध्यमातून नागरिकांना धमकावले जात असल्याचा मुद्दा आमदार लांडगे यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत सांगितले की, “राज्यात कायद्याचे राज्य चालेल. एसआरएच्या नावाखाली धमक्या देणाऱ्यांना पोलिस योग्य उत्तर देतील. एसआरएचा अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून मीच आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही.”