उपमुख्यमंत्री मीच, आमदार मीच, मंत्री मीच अन् चेअरमनही मीच!! अरे चाललंय काय?

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत स्वतः अजित पवार उतरले असून त्यांनी सगळी ताकद पणाला लावली आहे. यामुळे निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
असे असताना त्यांचे विरोधक आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावरती टिका केली आहे. उपमुख्यमंत्री मीच, आमदार मीच, सगळं मीच. अरे चाललंय काय? असा प्रश्न तावरेंनी विचारला. अजित पवारांची एक ना धड भाराभर चिध्या अशी अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली. यामुळे वातावरण तापले आहे.
गेल्या काही दिवसापासून अजित पवार मी हे करू, ते करू सांगत आहेत. पण अजित पवार फक्त बोलतात, काही करत नाही. आमच्याकडे 21 च्या 21 उमेदवार हे चेअरमन पदाच्या पात्रतेच्या आहेत. अजित पवारांच्या पॅनल मध्ये चेअरमन होणारं दुसरं कुणी आहे का ते सांगावं, असेही ते म्हणाले.
आमचं आणि अजित पवारांचं वैचारिक भांडण आहे. उपमुख्यमंत्री तेच, मंत्री तेच, आमदार तेच, सगळंच त्यांना पाहिजे असं म्हणत चंद्रराव तावरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यामुळे आता निकाल काय लागणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची साखर भिजली आहे. पण अजित पवार खोटं बोलत आहेत. जो आमच्या हिताच्या आड येईल त्याला आम्ही आडवा करू. अजित पवार हे खाजगीकरणालाच बळ देतात. ते सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत, असेही तावरे यांनी म्हटले आहे.