पती शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नाही, पुण्यात विवाहितेचा आरोप, कोर्टाने दिला महत्वाचा आदेश, नेमकं प्रकरण काय?

पुणे : पती शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचा आरोप करून त्याला सोडून गेलेल्या पत्नीचा दावा पुणे कौटुंबिक न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी फेटाळला. पत्नीने दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध स्थापित करावेत, असा आदेश न्यायाधीश गणेश घुले यांनी दिला.

केवळ आरोप करणे आणि ते कायद्याच्या आधारे सिद्ध करणे या दोन बाबी भिन्न आहेत,’ असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील पती-पत्नीचा विवाह २०२१ मध्ये झाला. मात्र, त्यानंतर पत्नी पतीचे घर सोडून निघून गेली.
त्यामुळे पतीने हिंदू विवाह कायद्यांतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. पतीच्या वतीने ॲड. मयूर साळुंके, ॲड. अजिंक्य साळुंके, ॲड. अमोल खोब्रागडे, ॲड. पल्लवी साळुंके यांनी बाजू मांडली.

पत्नीने कोणताही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली. त्यावर, पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, असे गंभीर आरोप पत्नीने केले.
हा विवाह रद्द करण्यासाठी दुसऱ्या न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्याचेही पत्नीने लेखी जबाबात नमूद केले. पतीने हे सर्व आरोप पुराव्यांच्या आधारे फेटाळून आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे ठामपणे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.
दरम्यान, पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला असला, तरीही कोणताही वैद्यकीय पुरावा दिला नाही; तसेच पत्नीच्या म्हणण्यात विसंगती असून, त्यातून तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.