दौंडमध्ये खळबळ! बायको म्हणाली, नवरा बेपत्ता झालाय, आणि पोलीस तपासात वेगळंच ‘लफडं’ आलं समोर..
दौंड : येथील भांडगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार येथील विवाहीत महिलेने यवत पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत तपास केल्यावर पोलिसांना वेगळाच संशय आला.
यामध्ये पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अतुल प्रभाकर चौगुले (सध्या रा भांडगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा पाटेठाण ता.दौंड जि.पुणे ) व शितल सुनिल जगताप (रा.भांडगाव ता.दौंड जि.पुणे ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शितल जगताप हिने यवत पोलीस ठाण्यात आपला पती सुनील जगताप हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेपत्ता सुनील जगताप याचा विहिरीमध्ये मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, शितल जगताप व अतुल चौगुले या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पती हे दारू पिऊन त्रास देत असल्याने शितल जगताप व तिचा प्रियकर अतुल चैघुले या दोघांनी सुनिल जगताप हे घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालुन खून केला.