पत्नीच्या खुनाप्रकरणात पतीची ८ वर्षानंतर निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय?

पुणे : पत्नीच्या खुनाच्या प्रकरणात आरोपी पतीला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रामबहाद्दूर विश्वकर्मा असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या न्यायालयाने दिला आहे.

हा निर्णय निगडी येथे २ मार्च २०१७ रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सुनावण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने हा निर्णय देतांना खटल्यातील सर्व पुरावे आणि बाजू विचारात घेतल्या. आरोपीच्या वतीने ॲड. पूजा अग्रवाल, ॲड. प्रकाश चव्हाण आणि ॲड. अनिश चिपडे यांनी प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली.

त्यानंतर तपासादरम्यान सादर केलेल्या साक्षीदारांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. तसेच, वैद्यकीय पुराव्यात तफावत होती आणि खुनाचा नेमका उद्देश सिद्ध होऊ शकला नाही. पोलिसांनी निष्काळजीपणे केलेला तपासही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

ॲड. अग्रवाल यांनी अंतिम युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा आधार घेत, आरोपीला चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे न्यायालयास समजावून सांगितले. सर्व पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून न्यायालयाने रामबहाद्दूर विश्वकर्मा यांची या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे.
