प्रवाशांनी भरलेली बस, तरी PMPML मध्येच वाहकाचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य, पुण्यात संतापजनक घटना

पुणे : पुण्यात प्रवासादरम्यान महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर एकच संताप व्यक्त केला जात आहे. कात्रज ते स्वारगेट मार्गावर धावणाऱ्या पीएमपी बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. यामुळे शहरात खळबळ उडाली.

याप्रकरणी वाहकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक अल्पवयीन मुलगी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या शेख याने पीडितेचा मोबाईल नंबर मागून तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
मुलीने नंबर देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर, आरोपीने वाईट हेतूने तिला स्पर्श केला आणि अश्लील कृत्य करून विनयभंग केला. आरिफ जलील शेख (वय ३५,) असे अटक केलेल्या नराधम वाहकाचे नाव आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाहकाच्या कृत्याने घाबरून न जाता मुलीने बसमध्येच आरडाओरडा केला.

प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने शेखला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग गंभीर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.