महिलांनो कशी ठेवाल पाहुण्यांची बडदास्त !

उरुळीकांचन :घरी आलेले पाहुणे आनंदाने व समाधानाने परतण्यातच गृहिणीचे खरे सुख असते. विशेषतः पाहुण्यांना पोटभर व सुग्रास जेवण नेटक्या पद्धतीने खाऊ घालण्यात गृहिणीला आगळेच समाधान लाभते. यासाठी पाहुणे घरी आल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

• पाहुणे येण्यापूर्वीच सारी तयारी करून ठेवावी. पाहुणे घरी आल्यानंतर आपण किचनमध्ये काम करीत राहू नये.
• डायनिंग टेबलवर परिटघडीची चादर अंथरून त्यावर ठेवाव्यात. स्वच्छ टेबलमेट्स ठेवाव्यात.
• पाहणे येण्यापूर्वीच जेवणास उपयुक्त भांडी टेबलावर ठेवावीत. प्लेट्स, चमचे व ग्लास व्यवस्थित ठेवावेत.
स्टॅण्डला काही चमचे जादा लावून ठेवावेत.
• टेबलावर आधीपासूनच पेपर नॅपकीन व पाणी ठेवावे.
• पाहुणे आल्यानंतर त्यांना आग्रहाने जेवण वाढावे. वाढताना घाई वा उतावळेपणा करु नये.
• जेवण वाढताना बळजबरी करुनये. तसेच खाणाऱ्याची आवड व आहारक्षमता लक्षात घ्यावी.
• जेवण गरमागरमच वाढावे. तसेच पाहुण्यांमध्ये पंक्तिप्रपंच करू नये.
• प्रत्येक खाद्यपदार्थाची चव वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यानुसार प्लेट वा कटोरी निवडावी.
• जवळ मेणबत्ती व काडेपेटी घेऊन बसावे. यामुळे वीज गेल्यास आपल्याला त्रास होणार नाही.
• कोणताही पदार्थ वाढायचा राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
आता आणखी काही वेगळ्या टिप्स :
फळांच्या साली फेकून देऊ नका

घरात स्वयंपाक करताना आपण अनेकदा फळांच्या साली आणि भाज्यांची देठं फेकून देतो मात्र, त्यांत आपल्या शरीराला आवश्यक असणारी अशी महत्त्वाची जीवनसत्वं असतात. म्हणून त्या फेकून देण्यापूर्वी आपण थोडा विचार करायला हवा.
केळीच्या साली : केळी खालल्यानंतर आपण केळीच्या साली फेकून देतो. केळीच्या सालीची भाजी खूप चविष्ट लागते. शिवाय त्यात पौष्टिक घटक सुद्धा असतात. अर्थात ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. मात्र बदल म्हणून अशी भाजी करायला हरकत नाही.
टरबुजाच्या साली : टरबुजाच्या साली सुद्धा वाळवून त्या वापरल्या जातात. शिवाय या सालीची भाजी सुद्धा खूप रुचकर लागते.
फळांच्या बिया : टरबूज आणि खरबूज यांच्या बिया फेकून न देता त्या
उन्हात कडक वाळवाव्यात आणि त्यानंतर त्या फोडून खाता येतात. हा एक प्रकारचा सुका मेवाच आहे. शिवाय या बिया गोड पदार्थात वापरता येतात.
फळभाज्यांच्या साली: बटाटा भाजी करताना अनेकदा साली काढून बटाटा भाजी केली जाते. मात्र साल न काढता सुद्धा भाजी तेवढीच रुचकर लागते. एकदा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. दोडक्याच्या साली किंवा शिरा काढून त्याची चटणी किंवा ठेचा करता येतो.
पालेभाज्यांची देठं : पालेभाज्या चिरताना त्यांची खूप देठं काढू नयेत,
यामुळे अनेकदा त्यातील सर्व जीवनसत्वं नष्ट होतात. कोवळी देठं असतील तर ती तशीच ठेवावीत आणि तशीच भाजी करावी. पालेभाज्या खूप जास्त बारीक चिरू नयेत. जर मुळांना माती लागली असेल तर ती स्वच्छ करावी मात्र त्यासाठी खूप जास्त पाणी वापरू नये.