वैष्णवी हगवणेचा दिर आणि सासऱ्याला कसं केलं अटक? पहाटे रंगला थरार, खेडेगावात लपले अन्…

पुणे : पुण्यात सध्या वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आले आहे. आज पहाटे वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास बावधन पोलिसांनी हगवणे पितापुत्राला बेड्या ठोकल्या. मृत्यूनंतर जवळपास आठवडाभरापासून दोघं पसार झाले होते.
वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणेची कालच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणेला ताब्यात घेण्यात आले होते.
पहाटेच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी यासारखा हुंडा कस्पटे कुटुंबाने हगवणे कुटुंबाला दिल्याचे समोर आले आहे. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ते दोघेही एका खेडेगावात लपून बसले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेच त्यांना अटक केली. या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करण्याची सूचना केली आहे. यामुळे अजून अनेकांना अटक होण्याची शक्यता आहे.
तसेच संशयितांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची तीन पथके होती. आणखी पथके वाढवण्यास सांगितले आहे. अजित पवार यांनी फोनवरून वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. हगवणे पिता-पुत्राला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही अजितदादांनी दिला होता.