भिगवण प्रकरणातील तरुणीला कसं पळवलं? नगरच्या दिशेनं गेलेली गाडी साताऱ्यात पोहोचली, रात्री १ वाजता कपल बारामतीत हजर.


पुणे : भिगवण येथे दिवसाढवळ्या झालेल्या तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. मात्र, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आले आहे.

ज्या तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती, त्याच तरुणीने आता पोलिसांसमोर हजर होऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण स्वमर्जीने तरुणासोबत गेली होती. आपलं त्याच्यावर प्रेम आहे, असं स्पष्टीकरण तरुणीने दिलं आहे. याशिवाय, नेमकी ही घटना कशी घडली? ती प्रियकरासोबत कशी पळून गेली? कुटुंबीयांना कसा चकवा देण्यात आला? याची सगळी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. तिने एका प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिली.

पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी घडली. घटनेच्या दिवशी मुलीची आई आणि भाऊ तिला घेऊन भिगवण येथील बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार होते. याची माहिती स्वत: तरुणीने प्रियकराला दिली होती. तसेच तू भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येवून थांब. मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्या सोबत निघून येणार आहे, असा फोन तिने तरुणाला केला होता.

प्रियकर तरुण भिगवण येथील रेस्ट हाऊस जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे एक टेम्पो गाडी घेऊन उभा होता. हे तिघेही मार्केटमध्ये आले असता तरुणीने आई आणि भावाची नजर चुकवून टेम्पोच्या दिशेनं पळ काढला आणि टॅम्पोत जाऊन बसली. यानंतर ती प्रियकराला घेऊन नगरच्या दिशेने गेले. पळून जात असताना तरुणीने आपल्या भावाला कॉल केला. पळून जात असल्याची माहितीही दिली.

तरुणीने पुढे सांगितलं की, आम्ही सुरुवातीला नगर दिशेने गेलो होतो. त्यानंतर नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने हडपसरला पोहोचलो. हडपसरवरून सासवड मार्गे सातारा जिल्ह्यातील वाठार बसस्टॉपला जाऊन थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो. मात्र बातम्यांमध्ये माझं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली. पण ही तक्रार खोटी आहे.

ही तक्रार माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा कोणाच्यातरी दबावावरून दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने तरुणाबरोबर निघून आली आहे. मला या पुढील आयुष्य त्याच्यासोबतच काढायचं आहे. या प्रकरणात त्याला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये, असंही तरुणीने सांगितलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!