एक व्यक्ती किती वेळा भरू शकते म्हाडाचा फॉर्म? काय आहेत म्हाडाचे नवीन नियम? जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : स्वतःचे घर असावे हे अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी हजारो नागरिक दरवर्षी म्हाडाच्या सोडतीकडे आशेने पाहतात. मात्र अर्ज करताना एक प्रश्न वारंवार समोर येतो.

एका व्यक्तीला किती वेळा आणि किती ठिकाणी अर्ज करता येतो? या संदर्भातील नियम स्पष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण ही राज्य सरकारची अधिकृत संस्था असून ती अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे काम करते.

मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा विविध मंडळांमार्फत दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळते.

तसेच एका सोडतीत एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करता येतो का, याचे उत्तर होय असे आहे. जर एखाद्या मंडळाच्या सोडतीत वेगवेगळ्या परिसरांमध्ये घरे उपलब्ध असतील, तर पात्र अर्जदार प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र अर्ज करू शकतो.

उदाहरणार्थ, मुंबई मंडळाच्या सोडतीत अंधेरी, गोरेगाव किंवा कांदिवली येथे घरे असतील, तर अर्जदार सर्व पर्यायांसाठी अर्ज करू शकतो. मात्र प्रत्येक घरासाठी वेगळे अर्ज शुल्क भरावे लागते. म्हणजेच तीन ठिकाणी अर्ज केल्यास तीन वेळा फी जमा करावी लागेल. तसेच उत्पन्न गट, वय, अधिवास  आणि इतर पात्रतेच्या अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

एकाच कालावधीत जर म्हाडाच्या विविध मंडळांच्या सोडती सुरू असतील. जसे मुंबई मंडळ, पुणे मंडळ किंवा कोकण मंडळ तर इच्छुक व्यक्ती प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र अर्ज करू शकते. मात्र प्रत्येक सोडतीसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागते आणि त्यासोबतच अनामत रक्कम भरावी लागते. अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना सर्व तपशील अचूक देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उर्वरित सर्व अर्ज आपोआप रद्द…

एका सोडतीत अर्जदाराला केवळ एकच घर मिळू शकते. जरी अनेक ठिकाणी अर्ज केले असले तरी संगणकीय लॉटरी प्रक्रियेद्वारे फक्त एकाच घराची निवड होते. एकदा घराची लॉटरी लागल्यानंतर उर्वरित सर्व अर्ज आपोआप रद्द होतात.

अर्ज करताना उत्पन्न गट योग्य निवडणे, कागदपत्रांची अचूक माहिती देणे, एकाच घरासाठी एकाच नावाने वारंवार अर्ज न करणे आणि अर्ज शुल्क तसेच अनामत रक्कम वेळेत भरणे या बाबींची विशेष काळजी घ्यावी. अनेक ठिकाणी अर्ज करण्याची परवानगी असल्यामुळे विशेषतः मुंबईसारख्या शहरात घर मिळण्याची शक्यता वाढते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!