मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत समसमान जागा वाटप व्हावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच ही माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने तब्बल १५० जागांवर उमेदवार उभे करण्याचं लक्ष्य ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या गप्पांदरम्यान याबाबतचे संकेत दिले असून, महायुतीतूनच मुंबई महापालिका लढवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, भाजपकडून जास्तीत जास्त जागा आपल्या ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केवळ ६५ ते ७५ जागा देण्याची शक्यता भाजप गोटातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या जागावाटपावर महायुतीत अंतर्गत मतभेद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपकडून उपनगर आणि मध्य मुंबईतील मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. कुलाबा, मलबार हिल, सायन आणि वडाळा यांसारख्या मतदारसंघांमध्ये भाजपकडून उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणं हे भाजपचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं आहे.
भाजपचे कार्यकर्तेही अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, महायुतीत ज्या जागांवर पेच निर्माण होईल, त्या संदर्भात संयुक्त चर्चेतून निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत जशी जागांची अदलाबदल दिसली होती, तशीच परिस्थिती मुंबई महापालिकेतही निर्माण होऊ शकते, अशी राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
महायुतीकडून ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू होऊ शकतात, अशी राजकीय माहिती मिळाली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या गणिताला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, या चर्चांवर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी “महायुतीचे जागावाटप हे राजकीय नाटक आहे,” असं म्हणत दोन्ही पक्षांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून १०० हून अधिक जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली दौर्यात शिंदेंनी समसमान जागावाटपाची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीच्या घरात दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत या जागावाटपावरून महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलताना दिसू शकतात.
