लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरू राहणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनानिमित्त सगळंच सांगितलं…

मुंबई : येथील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाली होते. यावेळी फडणवीस यांच्यासह आमदार मिहिर कोटेचा हेदेखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या १,५०० रुपयांच्या हप्त्यात लवकरच आणखी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि अंमलबजावणी सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी ही योजना लवकरच बंद होईल असे म्हटले होते. आजच्या घडीला अडीच कोटी लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार राज्यात आले. मात्र सध्या अनेकांची नावे कमी करण्यात आली आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ यापासून झालेली सुरुवात ती लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात २५ लाख महिला लखपतीदीदी तयार केल्या असून ही संख्या एक कोटींवर नेणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, लाडक्या बहिणींचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यातच आहे,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. सध्या योजनेत नावे कमी केल्याने विरोधक टीका करत असतात.