थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी कशी घ्याल ! कसे करावे घरगुती उपाय !!
उरुळी कांचन :थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे अशा व्यक्तींना आणि ज्यांना त्वचेचे विकार आहेत अशा व्यक्तींना त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज भासते. अन्यथा त्वचेच्या समस्या डोके वर काढण्याची शक्यता असते. म्हणूनच थंडीच्या दिवसात त्वचेची नेमकी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात त्याविषयी…
– त्वचेचा पोत सांभाळण्यासाठी साबणाऐवजी सौम्य शॉवरजेलचा वापर करा.
– आंघोळीसाठी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे त्वचेतील मॉईश्चर निघून जाईल. त्यामुळे त्वचा अजूनच शुष्क होईल.
आंघोळीच्या पाण्यामध्ये खोबरेल तेलाचा वापर करा किंवा शॉवर केल्यानंतर शॉवर मॉईश्चरायझर त्वचेवर लावावे. अन्यथा आंघोळीच्या आधी एखाद्या उत्तम तेलाने सर्वांगास मालीश करा.
– त्वचेवर स्क्रबर्स वापरणे टाळा. यामुळे त्वचेचे नुकसान वाढेल.
– आहारात जवस, सूर्यफूलाच्या बीया, भोपळ्याच्या बिया, अक्रोड, बदाम व मांसाहारही ठेवा. यामुळे शरीराला मॉईश्चरायझर मिळेल.
– सिंथेटिक तसेच घट्ट कपडे घालणे टाळा. यामुळे सतत त्वचेवर घर्षण वाढल्याने त्वचेचे नुकसान वाढण्याची शक्यता अधिक आहे.
– सोरायसिस झालेल्या व्यक्तींनी थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. म्हणूनच सोरायसिसच्या रुग्णांनी सोरायसिसमुळे नुकसान झालेल्या जागेवर घट्ट मॉईश्चरायझर लावावे. तर उर्वरित शरीराला नेहमीचे मॉईश्चरायझर लावावे. असे नियमित दिवसातून तीनदा करावे.
– सोरायसिसचा त्रास वाढू नये म्हणून तसेच डीहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी अल्कोहल (दारू), हवाबंद शीतपेय, निकोटीन टाळा.
आता काही विशेष टिप्स; हे आजमावून पाहा
■ अंडे फेटताना त्यात थोडेसे दही वा दूध मिसळावे. ऑम्लेट फुललेले व स्वादिष्ट होईल.
■ गॅसवर काम करताना खाद्यपदार्थ सांडल्याने बर्नरची ज्योत मंदावते. अशावेळी बर्नर खोलून रात्री सोड्याच्या पाण्यात ठेवावा. सकाळी फडक्याने साफ करून वापरावा.
■ कॉफी बनवताना त्यात थोडासा बोर्नव्हिटा वा कोको पावडर टाकली तर कॉफीची लज्जत वाढते.
■ तांदूळ भिजवण्यापूर्वी थोडेसे भाजल्यास डोसा कुरकुरीत व इडली मुलायम होते.
■ जर भाजीचा रस्सा पातळ झाला असेल तर त्यात कच्चा बटाटा कापून टाकावा.
■ तेल वा तुपात मळ असेल तर बटाट्याचा तुकडा त्यात टाकून तळावा. सारा मळ शोषून घेईल.
■ खिडकी वा दरवाजा बंद होताना अडकत असेल तर चौकटीवर मेण घासावे.
■ पनीर तयार करताना दुधात लिंबाऐवजी व्हिनेगर वापरून दूध फाडावे.
——-