हवामानाचा खेळ सुरूच! दुपारी कडक उन्हाळा, संध्याकाळी गारांसह मुसळधार पाऊस; १२ जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट…

पुणे : मुंबई आणि उपनगरांत सध्या ढगाळ वातावरण असून उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यापैकी १२ जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि पालघर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस तुरळक पाऊस होणार आहे.

तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज आणि उद्या ही स्थिती राहील त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होणार असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव, नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगर भागात आज ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून तुफान गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या आणि परवा या दोन दिवसांत या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर पावसाचा जोर कमी होत रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या गारपिटीचा इशारा असून शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विदर्भ आणि मराठवाडामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ५० ते ६० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, तसेच छत्री किंवा रेनकोट घेऊनच बाहेर पडावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.