पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात, दोन ट्रक अन् कारच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू…

पुणे : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन ट्रक आणि एका कारचा झालेल्या या भीषण धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर दोन्ही ट्रकला भीषण आग लागल्याने घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, कार या दोन ट्रकमध्ये अक्षरशः चिरडून अडकून बसली.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या दोन ट्रकची नवले पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर मधोमध येणारी एक कार दोन ट्रकच्या मध्ये अडकली आणि क्षणार्धात ज्वाळांनी पेट घेतला. या आगीत दोन्ही ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले असून कारही आग आणि धक्केमुळे ओळखू न येण्याजोगी झाली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अपघात इतका भयानक होता की अनेक प्रवासी ट्रकमध्येच अडकून पडले. अग्निशमन दलाने वेळेत धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु कार अजूनही ट्रकामध्ये अडकलेली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. या अपघातात सुमारे १६ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून पोलिस आणि अग्निशमन दलाकडून या संदर्भात तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी ट्रकची वेगाने केलेली समोरासमोर धडक हा मोठा मुद्दा असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे.
या अपघातानंतर नवले पुलावरील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला असून संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे-सातारा मार्ग हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने हजारो वाहनं तासन्तास अडकून पडली. प्रवाशांचे अक्षरशः हात-पाय गळाले असून वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे.
