पुणे -नाशिक महामार्गावर भयंकर अपघात!भरधाव कारची बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे: पुणे–नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे या ठिकाणी भरधाव कारने बसला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरात होती की, या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुणे-नाशिक महामार्गावर मध्यरात्री मंचरजवळील एकलहरे गावाजवळ भरधाव कारने लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मुलं गंभीर जखमी झाले. कारमधून प्रवास करणारे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. तर दोन्ही जखमींवर सध्या मंचर येथे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातामध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे मुलं पोरकी झाली. दरम्यान, एकलहरे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहे.